Jalgaon

जळगावच्या पाण्याचं वैशिष्ट्य वेगळंच

जळगाव जिल्ह्याला तसेच जळगावच्या व्यापार-उद्योग-व्यवसाय संदर्भात फार जुना इतिहास आहे. येथील व्यवहारिक आणी नीतिमूल्ये याची वैशिष्ट्ये सातासमुद्रापलिकडे सुद्धा नोंदविल्या गेली आहेत. अशाच पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे “कल्पनिती” प्रदर्शन होय. सौ.कल्पना शाह व सौ.नीता जैन यांनी मिळून 2012 साली “कल्पनिती” या प्रदर्शनीला सुरुवात केली. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही व्यावसायिक चळवळ.. यामध्ये सुमारे 24हून अधिक प्रदर्शनी आतापर्यंत आयोजित करण्यात आल्या. गेल्या आठवड्यात रीतसर परवानगी घेऊन या प्रदर्शनीची जोरदार सुरुवात झाली. अर्थात प्रदर्शनी रद्द करावी का? हा विचार उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दोन दिवसांपूर्वीच केला होता. मात्र, सर्व स्टॉलधारक आपआपल्या ठिकाणांवरून जळगावसाठी यायला निघून गेले होते, म्हणून रद्द करणे शक्य झाले नाही.
यामध्ये 75हून अधिक स्टॉल देशभरातून सहभागी झाले. जयपूर ,जोधपुर, कलकत्ता, बंगलोर, हैदराबाद, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि काश्मीर राज्यामधून सुद्धा स्टॉल्स लागले होते.

पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात छान झाली. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनुसार जळगाव महानगरपालिका पथकाने दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रदर्शनी थांबविण्यासंदर्भात तोंडी सूचना केली. तात्काळ सर्व महिलांनी एकत्रित निर्णय घेऊन प्रदर्शनी थांबविली. यामुळे संयोजकांची पुरती धावपळ झाली. या धावपळीमध्ये सामानाची आवरा सवर होतीच. याच बरोबर स्टॉलधारकांना सुरक्षित स्थळी व त्यांचा पुढील प्रवास सुखकारक करणे हीसुद्धा विशेष जवाबदारी होती आणि यामध्ये अचानक काही स्टॉलधारक विशेषतः ज्या स्थानिक महिला ज्यांना विशेष सहकार्य करून स्टॉल दिले होते, त्यांनी संताप व हुज्जत करत, अंगावर धावून येत पैशांची मागणी संयोजकांकडे केली. ही नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्ती होती यामध्ये संयोजकांचा कुठलाही व्यक्तीगत दोष किंवा त्रुटी नव्हती. अनेक वर्षांपासून येत असलेल्या बाहेरगावच्या स्टॉलधारकांनी अतिशय समजूतदारी दाखवत कोणत्याही प्रकारची आर्थिक परताव्याची मागणी केली नाही हे विशेष होय. मात्र, संयोजकांनी सोमवारी आपसात बैठक घेत सर्वच 75 स्टॉलधारकांना 25% रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला. अर्थात यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान होणार होते. कारण संयोजकांनी वेंडर्सला संपूर्ण रक्कम अदा केलेली होती. खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकरीचे होते. विशेष म्हणजे या पद्धतीच्या आपदांमध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये बाहेरगावच्या स्टॉल धारकांनी खूप मोठे सहकार्य केले आणि स्थानिकांनी विरोध केला. अर्थात या दोघा भगिनींनी धीर गंभीर राहून सुंदर नियोजन करून व्यवहार परिपूर्ण करून जळगावच्या नावलौकिकाला साजेसे असे व्यवहार केले. यामुळेच अनेक बाहेरगावच्या उत्पादकांनी पैसे न घेता तुम्हाला शक्य झाल्यास पुढील प्रदर्शनीमध्ये आम्ही येऊ त्यावेळेला जेवढे शक्य तेवढे कमी रक्कम घ्या, एवढी माफक विनंती केली. या सहकार्यामुळेच या दोघी भगिनी खचून न जाता प्रदर्शनी जास्तीत जास्त काळजीपूर्वक करण्याचा निर्णय घेऊन पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागल्या आणि विशेष म्हणजे त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी श्री.संतोष वाहुळे व त्यांचे सहकारी यांनी जी समयसूचकता दाखवून सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

भविष्यात आपण जळगावकरांनी जळगावकरांची मान उंचावणाऱ्या भगिनींचे मन भरून कौतुक करीत त्यांना यापुढेही विशेष प्रोत्साहन दिलेच पाहिजे, हे मात्र निश्चित.

आपला,
सुशील शामसुंदरजी नवाल
सीईओ
मल्टी मीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमिटेड – जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *